पणजी -वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) करण्यात आलेल्या नव्या सुधारणांमुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. शुक्रवारी गोव्यात जीएसटी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -पणजी ' स्मार्ट सिटी ' प्रकल्प मुख्याध्याधिकाऱ्यांची दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी - उदय मडकईकर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 10 तास चाललेल्या या बैठकीत देशातील सर्व राज्यांच्या मंत्रीमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर सीतारामन यांनी हॉटेल उद्योगाला चालना देणाऱ्या नव्या घोषणा केल्या. ज्यामध्ये 1000 रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचे जीएसटी नाही. तर 1001 ते 7500 पर्यंत 12 टक्के 7501च्यावर 18 टक्के जीएसटी लागू करण्यात येईल. या सर्व शिफारशी 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू होणार आहेत.
हेही वाचा -मानवी तस्करी रोखण्यासाठी राज्यांमध्ये समन्वयाची गरज - चोखा राम गर्ग
बैठकीत गोव्यातील पर्यटन उद्योगावर 28 टक्के जीएसटी आकारल्यामुळे परिणाम झाला, अशी मते उद्योजकांनी मांडली. त्यामुळे गोवा सरकारने हा जीएसटी दर कमी करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली. गोव्यात झालेल्या जीएसटी मंडळ बैठकीत हा मुद्दा गोव्याचे पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी उपस्थित केला होता. त्याला अन्य राज्यांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे हा निर्णय झाला, असे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, जीएसटीच्या नव्या दरामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाला चालना मिळेल. तसेच देशाची अर्थव्यवस्थेला उभारी घेण्यास मदत मिळणार आहे.