पणजी- मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम आदमी पार्टीने प्रतिज्ञापत्रा पाठोपाठ आज जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये दर सहा महिन्याला प्रभागात बैठकीचे आयोजनक करण्याचे आश्वासन आपने पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी उमेदवार वाल्मिकी नाईक, संयोजक एल्वीस गोम्स, सरचिटणीस प्रदीप पाटगावकर उपस्थित होते.
पणजी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना नाईक म्हणाले, पणजी हे आर्थिक, प्रशासकीय, रोजगार निर्मिती यामध्ये मागे राहिलेले शहर आहे. त्यामुळे पणजीचा सर्वांग, सुंदर विकास करण्याबरोबरच शहराचे नैसर्गिक वारसा जतन केला पाहिजे. येथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विकास आणि रोजगाराकरीता पणजीतील मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर दर सहा महिन्यांनी प्रत्येक प्रभागात बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.