पणजी- लहान वयातच बचतीची सवय लावली तर कुटुंबाच्या गंभीर प्रसंगी ही बचत कामाला येते. वयाच्या 18 वर्षांपासून ते 40 वर्षापर्यंत 55 ते 200 रुपये महिना भविष्यनिधी योजनेत बचत करण्याची सवय लावल्यास निवृत्तीनंतर मासिक किमान 3 हजार रुपये मिळतील, असे आवाहन केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
पाटो-पणजी येथील संस्कृती संकुलात शनिवारी झालेल्या 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन' योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नाईक म्हणाले की, केंद्र सरकारची ही एक चांगली योजना 6-7 महिन्यांआधी राज्यात सुरु होणार होती. आता ती प्रत्येक जिल्ह्यात सुरु केली जाते, हे पाहून आपल्याला आनंद होत आहे. आपल्या कुटुंबच्या गरजेला, आजारपणाला वा भविष्यातील अडचणीला उपयोग पडणारी ही योजना असून, त्याचा आपण सर्वांनी फायदा करून घ्यायला हवा. आज जागतिक मंदी सुरु असताना सामान्य व गरिबाची गरज भागवण्यासाठी ही योजना वेळेवर उपयोगी पडणार यात शंका नाही.