मुंबई- मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. दादर स्थानकावरून सुटणारी मडगांव - जनशब्दी एक्सप्रेस १० जून पासून नवा लूक घेऊन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. तसेच आता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणार आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
एलएचबी कोच लावणार
ट्रेन क्रमांक ०११५१/०११५२ दादर मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जनशताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला, गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या दादर व गोव्याच्या मडगांव ह्या स्थानकांदरम्यान रोज धावणारी गाडी आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या या एलएचबी कोच लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता दादर मडगांव जनशताब्दी एक्सप्रेसला १० जूनपासून एलएचबी कोच आणि प्रवाशांना निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी एक विस्टाडोम कोच लावण्यात येणार आहे. दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेसला चेअर कार ३ डबे, द्वितीय श्रेणी १०, जनरल कोच १, एसएलआर कोच १ आणि विस्टाडोम कोच १ असे एकूण १६ डब्याची एक्स्प्रेस असणार आहे. या एलएचबी डब्यामुळे एखादा अपघात झाल्यास जिवीतहानी कमी होते, तसेच गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.