पणजी- गोव्याच्या राजभवनापासून हाकेच्या अंतरावर समुद्रात अडकलेले मनुष्य आणि इंजिनिअरहित 'नू शी नलीनी' हे जहाज स्थलांतरित करण्यासाठी हॉलंडमधील 'मास्टर मरिन कंपनी'ची निवड करण्यात आली आहे. त्यांना सोमवारपर्यंत कामाचे आदेश देण्यात येतील. त्यानंतर प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
नू शी नलीनी हे नाफ्ता या रसायनाने भरलेले जहाज भरकटत दोनापावल येथील किनाऱ्याजवळ खडकावर अडकले आहे. या घटनेला पंधरवडा उलटून गेला आहे. ते नेमके कधी हलविणार याविषयी काहीच ठोस माहिती दिली जात नाही. केवळ प्रक्रिया सुरू आहे अथवा दोन दिवसांत कामाला सुरुवात होईल, असे सांगितले जात होते. परंतु, अद्याप काहीच हालचाल होताना दिसत नाही. म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज पणजीत एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना या विषयी विचरण्यात आले, त्यावेळी त्यांनी माहिती दिली.
डॉ. सावंत म्हणाले, मास्टर मरिन कंपनी या हॉलंडमधील अनुभवी कंपनीला दोनापावल समुद्रात अडकलेल्या जहाजातील नाफ्ता रिकामी करून ते स्थलांतरित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना सोमवारपर्यंत कामाचा आदेश जारी केला जाईल. जहाज स्थलांतरित करण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, कामाचा आदेश मिळताच सदर कंपनी आपली यंत्रणा आणणार आहे. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. परंतु, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.
दरम्यान, म्हादई पाणी वाटपाबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत कर्नाटकला दिलेले पत्र रद्द करण्याची मागणी केल्यास दहा दिवस उलटले. दिल्लीत गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दहा दिवसांत यावर लेखी उत्तर देण्याचे आश्वासन जावडेकरांनी दिले होते. परंतु, अद्याप त्यावर काहीच हालचाली झालेल्या दिसत नसल्याने विरोधी पक्षांकडून सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. सावंत म्हणाले, टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दहा दिवस म्हटले म्हणून तेवढ्या मुदतीत ते होईल, असे सांगता येत नाही. त्यामुळे धीर धरून अजून काही काळ प्रतीक्षा करावी. सरकार त्याविषयी आशावादी आहे.
हेही वाचा - नाफ्ता जहाज रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची घेणार मदत