पणजी - देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल सरकारकडून दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असून चीनशी त्याची तुलना करून सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, यचवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर आणि प्रवक्ते जनार्दन भंडारी उपस्थित होते. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. सर्वकाही सुरळीत असल्याचा आव आणणाऱ्या सरकारला वेळीच जाग आली नाही तर भयंकर आर्थिक संकट येईल, असे संजय झा म्हणाले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१९-२० वर्षासाठी जीडीपी 6.1 टक्क्यावर आणला असून तो मागील 6 वर्षांत सर्वात कमी दर आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था थंडावल्याचे संकेत दिले आहेत. शासकीय आकडेवारीत फेरफार करुन वित्तीय तूट 3.46 टक्के असल्याचा दावा केला आहे. मात्र, कॅगने ही तूट 5.8 टक्के असल्याचे सांगितले. सरकारने बेरोजगारीचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला असून मागील 5 वर्षांत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप झा यांनी केला.
हेही वाचा- काँग्रेसचे बाळासाहेब थोरात बनू शकतात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष