पणजी -वर्षातील शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर. डिसेंबर महिन्यात नाताळ साजरा करण्यासाठी आणि सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी पर्यटकांची गोव्यात तोबा गर्दी होते. गेली दोन वर्ष कोरोनामुळे पर्यटनावर मंदीचं सावट होतं. आता पुन्हा व्यवसाय उभारी घेईल, असं वाटत असतानाच गोव्यावर ओमायक्रॉनचे सावट पसरले ( Tourism In Crisis Due To Omicron Variant ) आहे. नाताळ पूर्वीच गोव्यात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर फिरले आहेत. त्यामुळे येथील बहुतेक हॉटेल आणि क्लब रिकामे दिसत आहेत. शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री गोव्यातील प्रसिद्ध असलेल्या क्लब कमाना आणि इतर ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून पर्यटक आटापिटा करत असायचे. आता मात्र क्लबच्या लोकांना रस्त्यावर उभे राहून पर्यटकांना बोलवावं लागत आहे. ओमायक्रॉन हा नवा व्हेरिअंट पसरतो आहे. या बातमीने लोक अचानक परतू लागले आहेत. त्यामुळे आम्ही लोकांना बोलावत असलो तरी केवळ विकेंडला गर्दी होते आहे, असे थालासाचे ज्युएल लोबो सांगतात.
Omicron Variant: गोव्यात ओमायक्रॉनची दहशत आणि निवडणुकीचे वारे
डिसेंबर महिना म्हणजे गोव्यामध्ये अतिशय उत्साहाचा गर्दीचा आणि पर्यटन व्यवसायातल्या उंचीचा काळ. मात्र, यंदा ओमायक्रॉनमुळे ( Tourism In Crisis Due To Omicron Variant ) गोव्यात दहशत पसरली आहे. तर निवडणुकीचे वारे ही जोरदार वाहू लागले आहेत.
यंदा गोव्यात परदेशी पर्यटक येण्याची शक्यता डिसेंबर महिन्यात कमीच आहे. कारण, सरकारने गोव्यात प्रवेश बंदी केली असून चार्टर विमान यांनादेखील प्रवेश बंदी केली आहे. गोव्यातील मुख्य आकर्षण असलेला सनबर्न फेस्टिवलही यंदा होणार नाही. गोव्यात रात्रभर सुरू असणारी दुकानं आता दहा वाजताच बंद होतात. कारण ग्राहकांची संख्या 40 टक्क्यांनी घटली आहे. गोव्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून पर्यटन व्यवसायावर प्रचंड मंदी आहे. रोजगार बुडाला आहे. त्यामुळे बेकारी आणि गरिबी वाढली आहे. गोव्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने किमान खाणी सुरू करायला हव्यात. कारण हा व्यवसायही गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे, असे वकिल अनिकेत देसाई सांगतात.
काय आहे गोव्यातील निवडणुकीचे वातावरण?
या सर्व पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनाही प्रचारामध्ये दमछाक होऊ लागली आहे. गोव्यात पोस्टर युद्ध दिसत असून केजरीवाल यांचा आप आणि ममतादीदी यांचा टीएमसी आघाडीवर दिसतो आहे. विमानतळापासून पणजी पर्यंत हे पोस्टर युद्ध दिसत असले तरी प्रत्यक्ष लढाई काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षात आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नंतर भाजपाचा चेहरा कोण असेल, हा प्रश्न भाजपाला सतावतो आहे. तर काँग्रेस आपल्या जुन्या दिगंबर कामत यांच्या कामांवर विसंबून आहे. पी.चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात काँग्रेस काम करत असली तरी टीएमसीने छेडलेल्या नव्या मुद्दयाने काँग्रेस त्रस्त झाली आहे.
निवडणुकीचे मुद्दे काय असतील?
गोव्यात बेरोजगारी मंदी गरिबी आणि रखडलेला विकास यावर सध्या भाष्य करताना कोणताही राजकीय पक्ष दिसत नाही. प्रत्येक पक्षाने भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा केला आहे. एका सामाजिक संस्थेच्या आधाराने टीएमसीने गोव्यात 35 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या घोटाळ्यातील पैसे सरकारने वसूल केल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात तीन लाख रुपये जमा होतील, असा दावाही टीएमसीने केला आहे. गोव्यात 2012 मध्ये न्यायमूर्ती एम बी शहा यांच्या अहवालाच्या आधारे भाजपाने काँग्रेसला घेरले होते. 35 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला होता. मात्र, प्रत्यक्षात मनोहर पररिकर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तीन हजार कोटींचे केवळ नुकसान असल्याचे सांगितले होते. गोव्यात बेरोजगारीचा दर अकरा टक्क्यांवर आला आहे. कोरोनामुळे जनतेकडे कुठलाही पैसा नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना प्रचाराचे नेमके मुद्दे अद्याप सापडलेले नाहीत. आता पुन्हा एकदा जर ओमायक्रॉनमुळे लॉकडाऊन झाले, तर मात्र गोव्यातील सामान्य जनतेच्या सर्वनाशाला कोणी रोखू शकणार नाही, असं टॅक्सीचालक अश्रफ म्हणाले.