गोवा - पणजीत गोवा सुरक्षा मंचाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपने व्यक्तीगत स्वार्थासाठी गोवा कॅसिनो माफियांना विकून टाकला आहे. कॅसिनो स्थलांतराच्या प्रश्नावर भाजपने मागील 7 वर्षे गोवा वासियांची दिशाभूल केली आहे, अशी टीका सुभाष वेलिंगकर यांनी यावेळी केली.
भाजप सरकारविरोधात गोवा सुरक्षा मंचाकडून मोर्चाचे आयोजन
कॅसिनोमुळे गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन होत आहे. त्यामुळे भाजप सरकारने कॅसिनो व्यवहारावर त्वरित श्वेतपत्रिका जारी करावी. कॅसिनोविरोधात आंदोलनाची सुरवात म्हणून बुधवार 10 जुलैला शहरात मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मंचाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने गेमिंग कमिशनरची नियुक्ती करावी, कॅसिनोच्या आतापर्यंतच्या व्यवहारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, कॅसिनो मांडवीतून नेमके कधी हटविले जाणार याची कालमर्यादा जाहीर करावी, तसेच ते कुठे स्थलांतरित करणार तेही जाहीर करावे. अशा मागण्या यावेळी मंचाकडून करण्यात आल्या. भाजप सरकार गोव्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकृतीकरणास कारणीभूत आहे. याचा निषेध करण्यासाठी 10 जुलैला दुपारी 3 वाजता पणजीतील इमेक्यूलेट चर्च चौक ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, असे वेलिंगकर यावेळी म्हणाले.