पणजी : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अजून काही काळ लॉकडाऊन वाढविण्याची शिफारस गोव्याने केंद्राकडे केली आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज 'महालक्ष्मी' निवास्थानी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सावंत म्हणाले, आज पंतप्रधानानी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्स्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्यामध्ये जेथे अधिक रुग्ण सापडले अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळाली. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना रविवारी पंतप्रधानांशी संवाद साधता येणार आहे. यावेळी गोव्याच्या दुष्टीने आवश्यक बाबींची माहिती देणार आहे. परंतु, आज जरी संधी मिळालेली नसली तरीही आम्ही यापूर्वी आमचे म्हणणे लेखी सादर केले आहे. ज्यामध्ये लॉकडाऊन कालावधी वाढविण्याची शिफारस केली आहे. अजून काही काळ विमान, रेल्वे सुरू करू नये तसेच राज्यांच्या सीमा आहे तशाच बंद ठेवाव्यात, अशी मागणी केली आहे.
गोव्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सोमवारपासून काही सरकारी कार्यालये सुरू करण्यात येतील. तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यातील खाजगी डॉक्टर्सना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यावेळी एखाद्या रुग्णात कोविड-19 ची लक्ष दिसत असल्यास गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविण्याचे सूचित केले आहे. गोमेकॉ वगळता सर्व सरकारी आरोग्य केंद्राचे बाह्य रुग्ण विभाग सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.
गोव्यातील जनतेसाठी केरळ आणि कर्नाटक वगळता अन्य राज्यातून चिकन, मटन आयातीस परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी तेथील आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. तसेच मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीतीची पाहणी करून अहवाल देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिचा प्राथमिक अहवाल 15 दिवसांत मिळणार आहे. तर राज्याला पुढील वर्षभरात कोणत्या गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील याचा आढावा घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, राज्यातील सहकारी संस्था 15 एप्रिलनंतरच सुरू होतील. तर गोव्यातील महत्त्वाचा असलेल्या मच्छीमारी व्यवसाय आजपासून सुरू करण्यासाठी अटी घालूनच परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 30 ते 40 हजार मजूर बोटींवर जातील. परंतु, ते समुद्रात दुसऱ्या जहाजांशी कोणत्याही प्रकारची देवाण घेवाण करणार नाहीत. तसेच आरोग्याची खबरदारी घेतील. आतापर्यंत 3314 विदेशी पर्यटक गोव्यातून आपल्या मायदेशी गेले आहेत. तर सुमारे 300 ते 400 विदेशी पर्यटक अद्याप आहेत. दि. 3 एप्रिलनंतर गोव्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तरीही सर्व क्वारंटाईन सुविधा आहे तशाच ठेवण्यात आल्या आहेत.
गोव्यात करण्यात येणाऱ्या कम्युनिटी सर्व्हसाठी संबंधितांना आज दुसऱ्यांदा प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आरोग्याची स्थिती समजून येईल. ज्यामुळे भविष्यात राज्य आरोग्याच्या द्रूष्टीने सुरक्षित असल्याचे घोषित करण्यासाठी मदत होईल. दरम्यान, केंद्र सरकारने आज अनावरण केलेले आरोग्य सेतू अॅप' गोमंतकीयांनी डाऊनलोड करून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याबरोबरच विदेशात अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार पावले उचलली जातील. शेती आणि मान्सून पूर्व सरकारी कामे करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.