पणजी - गोव्यात सध्या निवडणुकांसोबत पर्यटन, फेस्टिव्हलचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच नवीन वर्ष, ख्रिसमस, संनबर्न सारखे कार्यक्रम होऊ घातले आहेत , यावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्य पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.
फेस्टिवल आणि निवडणुकांसाठी राज्यातील पोलीस यंत्रणा सज्ज गोव्याच्या विकासाचा प्रत्येक महामार्ग महाराष्ट्रातूनच जातो. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर आजही गोवा राज्य आजही कर्नाटक आणि महाराष्ट्रावर अवलंबून आहे. या दोन्ही राज्यांच्या कुशीत असणाऱ्या गोव्याला निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून श्रीमंत असा निसर्ग दिलाय, त्यामुळे अनेक देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होतात. सध्या गोव्यात पर्यटनाचा जोरदार हंगाम सुरू झाला आहे. अवघ्या महिनाभरावर ख्रिसमस व नवीन वर्ष येऊन ठेपले आहे. त्यातच विधानसभेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. मात्र यावेळी गोव्याने यासाठी महाराष्ट्र पोलिसांची मदत मागितली आहे. यासाठीची एक संयुक्त बैठक पार पडली. यात दोन्ही राज्यांनी एकमेकांना साहाय्य करायचे आश्वासन दिले.
पर्यटन, राष्ट्रीय महामार्ग-कोकण रेल्वे आणि गोव्याचा विकास -
गोव्याच्या विकासाचे सर्वात महत्वाचे साधन म्हणजे पर्यटन. आणि याच पर्यटनाच्या विकासाला हातभार लावला तो महाराष्ट्र - गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आणि कोंकण रेल्वे. या दोन्ही मार्गामुळे दक्षिण आणि उत्तर भारतातील पर्यटक गोव्यात दाखल होतात. म्हणूनच हे दोन्ही मार्ग गोव्याच्या विकासाचे महामार्ग आहेत.
राजकारणाचा मार्गही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातूनच
राज्यातील भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या राजकारणाचे महत्वाचे निर्णय किंवा राजकीय घडामोडी या मुंबई आणि दिल्लीतूनच घडतात.२०१७ च्या निवडणुकीची सूत्रे हलविली होती ती मराठमोळे नेते नितीन गडकरी यांनी. आणि सध्या ती भूमिका खांद्यावर आहे ती देवेन्द्र फडणवीस यांच्या. सोबतच भाजपचे कर्नाटक चे नेते सी टी रवी आणि काँग्रेस कडून भूमिका पार पाडतात ते कर्नाटक चे माजी मंत्री दिनेश गुंडू राव. म्हणूनच गोव्याच्या विकासाचा आणि राजकारणाचा महामार्ग हा कर्नाटक आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातूनच जातो. आणि या महामार्गावर पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. यासाठीच दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांना साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.