पणजी - गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या मुलाने अव्वल कारकून नोकरीसाठी सादर केलेले पदवीप्रमाणपत्र बनावट निघाले आहे. तसे गोवा विद्यापीठाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना कळवले आहे. त्यामुळे फर्नांडिस यांनी पदावरून तत्काळ पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
गोवा उपसभापतींनी तत्काळ पायउतार होण्याची विरोधकांची मागणी... हेही वाचा...कोरोना खबरदारी : मध्यरात्रीपासून 'या' शहरातील चित्रपटगृहे, जिम्स, नाट्यगृहे बंद
इजिदोर फर्नांडिस यांच्या मुलाने अव्वल कारकून या सरकारी नोकरीसाठी अर्ज सादर केला होता. त्याच्यासोबत पदवी आणि संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र जोडले होते. ज्याला सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी आक्षेप घेत राज्याच्या मुख्य सचिवांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने गोवा विद्यापीठाला सदर प्रमाणपत्रातील विद्यापीठ आणि पदवी यांची पडताळणीचा आदेश दिला होता. त्यानुसार गोवा विद्यापीठाने आपला अहवाल सादर करणारे पत्र दिले. ज्यात, 'ज्या पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितले होते. ते देणारे विद्यापीठ अस्तित्वात नसून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून बनावट विद्यापीठांच्या यादीत टाकण्यात आले आहे. लखनौमधील भारतीय शिक्षा परिषद नावाच्या या विद्यापीठचा वाद सध्या न्यायालयात आहे. तर संगणक प्रमाणपत्र देणारे केंद्र बंद असून तशा प्रकारच्या प्रशिक्षणाला गोवा विद्यापीठाने मंजुरी दिलेली नाही' असे म्हटले आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस प्रशांत नाईक हे या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, गोव्याचे उपसभापती म्हणून इजिदोर फर्नांडिस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांच्या मुलाने अव्वल कारकून नोकरीसाठी खोटेप्रमाणपत्र जोडले आहे. गोवा विद्यापीठाने पडताळणी केली असता, त्या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाणी मान्यता नाही. त्यामुळे यावर तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. फर्नांडिस स्वतः राजीनामा देत नसतील तर आम्ही राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, म्हणून मागणी करणार. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांनीही लक्ष घालावे. फर्नांडिस ज्या काणकोणचे प्रतिनिधित्व करतात तो सुशिक्षितांचा भाग आहे. परंतु, त्यांनी आपल्या अशा क्रुत्याने काणकोणची प्रतिमा मलिन केली असल्याचे प्रशांत नाईक यांनी म्हटले.
हेही वाचा...येस बँक घोटाळा: राणा कपूरसह पत्नीवर सीबीआयने नोंदविला नवा गुन्हा
गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'गोव्याचे उपसभापतींच्या मुलाने खोटे पदवीप्रमाणपत्र सादर केले आहे. प्रमाणपत्र खोटे तसेच सदरचे विद्यापीठ बनावट असल्याचे समोर आले आहे. हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेले, हे उघड होत आहे. जनतेच्या नव्हे तर स्वतःच्या अशा प्रकारच्या विकासासाठी गेले आहेत. यामध्ये घोटाळा असल्याचे काँग्रेसला जाणवत आहे. त्यामुळे फर्नांडिस यांनी नैतिकता मानून राजीनामा द्यावा. तसेच त्यांना उपसभापती करण्यासाठी ज्यांनी मतदान केले त्यानीही या घटनेचा विचार करावा, की त्यांनी काय चूक केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची विशेष तपासणी पथकाद्वारे चौकशी करावी. ज्यामुळे गोव्यात अशा प्रकारे किती बनावट पदव्या आहेत. हे उघड होईल' असे प्रतिमा कुतिन्हो यांनी म्हटले आहे.