पणजी -देशभरातकोरोनाने कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारनेही आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच गर्दीची ठिकाणे पूर्णतः बंद तर काही 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. तसेच राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्वांची अंमलबजावणी 30 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समिती आणि आरोग्य समिती यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये कोविड रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्याचे निश्चित करण्यात आली. या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय
डॉ. सावंत म्हणाले, कोविडची दूसरी लाट नियंत्रणासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहे. वाढती रूग्णसंख्या विचारात घेऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, इएसआय रुग्णालय, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवीण्यात आली आहे. तसेच कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहे. दररोज पाच हजार चाचण्यांचे लक्ष ठरविण्यात आले आहे. राज्यात रेमडेसिवीर औषध पुरेसा साठा असून पुढील चार दिवसांत 10 हजार डोस उपलब्ध होतील. त्यामुळे ज्यांना लक्षणे जाणवतात. त्यांनी तत्काळ चाचणी करून घ्यावी. तसेच जे गृहलगीकरणात राहतील त्यांना पहिल्या दिवसापासून 'होम आयसोलेशन कीट' उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनशी चर्चा करण्यात आली असून त्यांच्याशी नोंदणीकृत डॉक्टर तालुकास्तरावर रुग्णांशी संवाद साधण्यासाठी मदत करणार आहेत. कोविड नियंत्रणासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करत आहेत. त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये.
आजच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी 24 तास सेवा देणारी लोकसंपर्क एजन्सी सुरू करण्यात येणार आहे.
- लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. तसेच पाचपेक्षा अधिक लोकांनी गर्दी करू नये, यासाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे.
- रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल. मात्र या काळात मालवाहतूक सेवा रोखली जाणार नाही.
- कॅसिनो, बार अँड रेस्टॉरंट, रिव्हर क्रूज, चित्रपटगृहे, मसाज पार्लर, सार्वजनिक वाहतूक आदी 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
- तरण तलाव (स्विमींग पूल), जीमखाने, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा बंद राहतील.
- लग्नसोहळ्याला 50 जणांना उपस्थित राहता येईल. मात्र उपजिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक
- अंत्यविधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहता येईल. यासाठी परवानगी आवश्यकता नाही.
- धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे बंद राहतील. मात्र, पारंपरिक रोजच्या धार्मिक विधी होतील.
- जत्रा त्याच गावातील मोजक्या ग्रामस्थांनी साजरी करावी.
- गोवा बोर्डातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
- अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी लॉकडाऊन केले जाणार नाही
रुग्ण संख्या वाढली तर...?
गोव्यात जर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली तर काय याची राज्य सरकारने तजवीज केली आहे. यासाठी येत्या 10 मे पर्यंत बांबोळी येथे नव्याने उभारलेल्या सुपरस्पेशलिटी रुग्णालय कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री डॉ सावंत म्हणाले, आजच्या निर्णयाची घोषणा करण्यापूर्वी राज्यातील सर्व आमदारांनी व्हर्च्यूअल संवाद साधला आहे. या काळात लसिकरण वाढविले जाणार आहे. केंद्र सरकार मोफत देत असलेल्या लसी सोबत गोवा सरकारही आवश्यकता भासल्यास लस खरेदी करणार आहे. सध्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची चाचणी बंधनकारक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, जे रुग्ण बरे झालेले आहेत अशांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या