पणजी - गोव्यातील औद्योगिक परिसर क्षेत्रात दारूच्या दुकानांना (बार) परवानगी न देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. स्वच्छ आणि हरित गोव्याबरोबर लोकहिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती गोव्याचे उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
लोकहित आणि कामगारांची सुरक्षा राखण्यासाठी प्रत्येक औद्योगिक वसाहत 'अल्कोहोल मुक्त' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कामगार सुरक्षेसंबंधी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीमध्ये दारू विक्रीचा विपरीत परिणाम उद्योगावर होत असून राज्यातील 22 औद्योगिक वसाहती अल्कोहोल मुक्त करण्याची गरज आहे. तसेच हरित गोवा राखण्यासाठी प्रत्येक उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेल्या अटींचे पालक करणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन करण्यात आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मंडळाला देण्यात आले आहेत, असे ट्विट राणे यांनी केले आहे. या दोन्ही निर्णयांमुळे गोव्याचा विकास साधण्यासाठी अधिक मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.