पणजी- तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर यांनी 2009-10 मध्ये लोकलेखा समिती अहवालाआधारे गोव्यात 35 हजार कोटींचा खाण घोटाळा झाला म्हणून काँग्रेस आणि त्यांचे नेते यांची बदनामी केली. ज्या अहवालाचा दाखला देत त्यांनी ही बदनामी केली आता तो अहवाल जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी गोमंतकीयांसमोर सादर करावा, असे आवाहन काँग्रेसने गोवा भाजप आणि मुख्यमंत्री सावंत यांना केले आहे.
मग पर्रिकरांनी गोव्यांची बदनामी का केली?
काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, पर्रिकर यांनी गोव्यात 35 हजार कोटींचा खाण घोटाळा झाला म्हणत काँग्रेस आणि नेत्यांवर आरोप केले. काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. अलीकडे अशा प्रकारचा घोटाळा झाला नव्हता. तर शहा आयोगाने अंदाज वर्तविला होता. त्यामुळे त्याच्या भरपाईचा प्रश्न निर्माण होत नाही, असे पत्र गोवा सरकारच्या खनिकर्म विभागाने एका अर्जदास दिले होते. जर घोटाळा नव्हता तर पर्रिकर आणि भाजपने गोव्याची बदनामी का केली? येथील अर्थव्यवस्था का संपविली? असा सवाल करत याची जबाबदारी घेत सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते पर्रिकर ज्या लोकलेखा समिती अहवाला आधारे घोटाळा झाला म्हणत होते, तो अहवाल सार्वजनिक स्वरूपात लोकांसमोर जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी ठेवावा. तसेच यासर्वांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.