पणजी - नाफ्ताने भरलेले जहाज दोनापावल येथील समुद्रात अडकलेले आहे. ते रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची मदत घेतली जाणार आहे. यासाठी दोन कंपन्यांनी पाहणी करून 'कोटेशन' दिले आहे. दोन दिवसात कार्यवाही सुरु होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवारी 'महालक्ष्मी' या सरकारी निवासस्थानी दिली. गोव्यात सध्या वेगाने घडणाऱ्या विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि भाजप आमदारांना याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठक बोलावली होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, यापूर्वी 'नू-शी-नलिनी' जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यासाठी ज्यांना काम दिले होते त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आम्हाला यामध्ये प्रयोग करायचे नाहीत. कोणत्याही प्रकारची हानी न होता संबंधित जहाजातील नाफ्ता हलविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिंगापूर स्थित अनुभवी ३ कंपन्यांना पाचारण केले होते. मात्र, दोन कंपन्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून 'कोटेशन' सादर केले आहे. आज ते उघडल्यानंतर उद्यापासून काम दिले जाईल. येथे उपलब्ध साहित्याने शक्य झाले तर आठ दिवसात काम पूर्ण होईल. पण बाहेरून मदत आणावी लागली, तर 15 दिवस लागतील. जहाज सुरक्षित असून त्यामधील टँकर भरलेल्या नाफ्त्यासाठी नायट्रोजन आवश्यक प्रमाणात आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही.