पणजी - केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोवा सरकारने सोमवारपासून सर्व कार्यलयांचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांनी कार्यालयात कामासाठी येवू नये, असे सूचित करण्यात आले आहे.
पोलिस, होमगार्ड, नागरी संरक्षण, अग्निशामक आणि आपत्ती व्यवस्थापन सेवा, तुरुंग आणि नगरपालिका सेवा यांचे कामकाज कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू करण्याचा गोवा सरकारने निर्णय घेतला आहे. याबरोबरच राज्यातील अन्य सरकारी विभाग आणि स्वायत्त संस्था मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम करणार आहेत.
हेही वाचा-कोरोनाची लक्षणे दिसल्यास लपवू नका - मुख्यमंत्री
अशी असणार कर्मचाऱ्यांची उपस्थिती-
'अ' आणि 'ब' श्रेणीतील अधिकारी कायम उपस्थित असतील. तसेच 'क' श्रेणीतील कर्मचारी आणि त्याखालील गटातील कर्मचारी यांचे प्रमाण ३३ टक्के असणार आहे. जिल्हा प्रशासन आणि कोषागार आदी कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम करणार आहेत. प्राणीसंग्रहालय, रोपवाटिका, वन्यजीव, अग्निशामक, बागकाम आणि गस्त आदींशी निगडीत कामे वन कार्यालयाचे कर्मचारी करणार आहेत. अशा पद्धतीने काम करताना कार्यालय प्रमुखांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य कर्मचाऱ्यांनी घराकडूनच काम करावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
हेही वाचा-सकाळी काठी उगारणारे पोलीसकाका संध्याकाळी दारात केक घेऊन येतात तेव्हा..
थंडी, ताप असेल तर उपचार घेण्याची सूचना-
ठराविक दिवशी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सकाळी ९ ते ४, सकाळी ९.३० ते ५ आणि सकाळी ९.३० ते ५.३० असे गट (शिफ्ट) करण्यात आले आहे. तसेच आवश्यकता भासल्यास बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याला खोकला, ताप, थंडी अथवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर सरकारी डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, असे सांगण्यात आले. विभागाच्या माहितीसाठी डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन डिजिटल पद्धतीने पाठवावे, असे सूचविण्यात आले आहे.