पणजी - गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. त्याबरोबरच सध्या शिमगोत्सव सुरू आहे. अशा स्थितीत कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकारने इपिडेमिक डिसीज अँक्ट 1897 ची अंमलबजावणी केली आहे. तसेच इयत्ता नववीपर्यंतचे वर्ग पुढील काही दिवस बंद ठेवावे या निर्णयाप्रत आले असून, अंतिम निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घेणार आहेत. अशी माहिती गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. त्यांनी आज मिरामार येथील आपल्या खाजगी कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकारने लागू केला सार्वजनिक आरोग्य कायदा हेही वाचा -कोरोनाबाबत जनजागृती अन् दरवाज्यांची स्वच्छता करणारे रोबो लाँच
राणे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचे टाळले पाहिजे. तसेच गोव्याच्या हिताचा आणि आरोग्याचा विचार करता शिमगोत्सव रद्द केला पाहिजे, असे मला वाटते. परंतु, यावरील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्या (शनिवार) पर्यंत घेतील अशी अपेक्षा आहे. सरकार इयत्ता 9वी पर्यंतचे वर्ग पुढील काही काळापर्यंत बंद ठेवण्याच्या विचारात असून केवळ 10 वीची परीक्षा घेतली जावी यावर विचार सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकांनी एकत्रित येऊ नये यासाठी हॉटेल आणि अन्य ठिकाणी होणारे लग्न समारंभ अथवा सोहळे रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गोवा, दमण आणि दीवमध्ये सार्वजनिक आरोग्य कायदा 1985 लागू करण्यात आला आहे. त्याबरोबर 1897 च्या इपिडेमिक डिसीज कायद्यानूसार कारवाई करण्यात येईल, असे सांगून राणे म्हणाले, शिमगोत्सव आणि शाळांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशावेळी प्रचारावर काही निर्बंध आणण्यात येणार आहेत का? असे विचारले असता राणे म्हणाले. लोकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येणे टाळले पाहिजे. तसेच हात स्वच्छ धुतले पाहिजे.
संशयीत रुग्णांची चाचणी निगेटीव्ह -
राणे म्हणाले विमानातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. तर सीमाभागातील रहदारी दरम्यान प्रवाशांची तपासणी कोणत्या प्रकारे करावी, याबाबच निर्णय आरोग्य सचिव घेतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, गोव्यात दाखल करण्यात आलेल्या सर्व संशयित रुग्णांचे रक्त नमुने नकारात्मक आले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सध्या केवळ एकच संशयित रुग्ण आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून गोमेकॉमध्ये सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. तर आयसोलेशन विभागात 20 हून अधिक डॉक्टरांना 31 मार्चपर्यंत वेळापत्रक नेमून दिले आहेत. तर अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आणि आरोग्य संचालक डॉ. ज्यो डिसा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.