पणजी - सर्वत्र दिवाळीची धूम सुरू असताना गोमंतकीय ही दिवाळीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यात दिवाळीचे खास आकर्षण आहे ते नरकासुर. नरकासुर बनविण्याची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली असून, त्याचा दहनाने गोव्यातील दिवाळीला खऱ्याअर्थाने सुरुवात होणार आहे.
गोव्यात दिवाळीचे आकर्षण असणाऱ्या नारकसुरचीही तयारी अंतिम टप्प्यात स्थानिक पोह्यांना बाजारात मागणी -
राज्यातील शेतकरी स्थानिक तांदळापासून बनविलेले पोहे बाजारात विकायला आणत असतात, गोमंतकीय व पर्यटकांकडून हे पोहे विकतही घेतले जातात. गोव्यातील प्रत्येक घरात गोड पद्धतीने हे पोहे बनविले जातात. शिवाय घरगुती पद्धतीने व बचतगटाच्या माध्यमातून बनविलेल्या फराळाला स्थानिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. करंज्या, लाडू, चकली, शेव , खोबऱ्याच्या वड्या व उकडलेली रताळी हे फराळातील मुख्य पदार्थ आहेत.
शेतातील तांदळापासून बनविलेले पोहे हे आमचे दिवाळीतील पारंपारिक खाद्य असल्याचे येथील स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.
नरकासुर हे दिवाळीचे खास आकर्षण -
राज्यातील दिवाळी नरकासुरविना अधुरीच आहे. दसऱ्यानंतर राज्यात नरकासुर बनविण्यास सुरुवात होते. रात्रंदिवस मेहनत करून सुमारे 25 ते 40 फुटांचे विविध रूपातील नरकासुर बनविले जातात. राज्यात सुमारे असे 400 हुन अधिक नरकासुर बनविले जातात व ते नरकचतुर्दशीच्या रात्री स्पर्धेसाठी राजधानी पणजी येथे आणले जातात. नरकचतुर्दशीच्या रात्री संपूर्ण रात्रभर या नरकासुराचा खेळ चालविला जातो. यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ही दिली जातात. राज्यातील विविध भागांतील मंडळांचे नरकासुर ही तेथील विशेषतः आहे. दिवाळीत नरकासुर बनविणे ही आमची परंपरा असून ती जोपासण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा आमचा वारसा जपण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून नरकासुर बनवीत असल्याचे येथील कलाकारांनी सांगितले.
स्थानिक बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड -
राज्यातील म्हापसा, पणजी, मडगाव, वास्को या मुख्य शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे. विविध प्रकारचे आकाशकंदील, पणत्या, खाद्यपदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सोबतच नरकासुराचे मोठे मुखवटे ही राज्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
राज्यातील तुळसी विवाहापर्यंत साजरी होते दिवाळी -
राज्यात भाऊबीज, वसुबारस, लक्ष्मीपूजन या महत्वाच्या दिवसांत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, हाच उत्साह तुळसी विवाहापर्यंत कायम असतो. तुळसी विवाहाला खास सोहळा घराघरांत पाहायला मिळतो. अनेक लोक या दिवशी आपल्या तुळशी मातेला सजवून सजवून, रंगरंगोटी करून तिची पूजा करतात. या दिवसांनंतर गोव्यातील दिवाळीची सांगता होते. आजही गोव्यातील प्रत्येक घरासमोर व चौकाचौकात हाताने बनविलेले आकाशकंदील लावले जातात.
दिवाळी अंकाची वाचकांना खास भेट -
राज्यात लोकमत, तरुणभारत, गोमंतक, नवप्रभा, गोवन वार्ता, भांगर भुय या वृत्तपत्रांचे खास दिवाळीअंक प्रसिद्ध होतात, मराठी सोबत कोंकणी भाषेतील दिवाळी अंकांना वाचकांची पसंती असते. महाराष्ट्र व गोव्यातील विविध प्रकाशनाचे दिवाळीअंक पेपर स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध असतात. मराठीसोबतच गोमंतकीय साहित्य, कथा , कविता व चारोळ्याना यातून प्रसिद्धी दिली जाते.
पर्यटनाचा हंगाम सुरू -
राज्यात दिवाळी सुट्ट्यांच्या आंनद लुटण्यासाठी हजारो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर भारतातील हजारो पर्यटक सध्या गोव्यात दाखल होत आहेत. उत्तर गोव्यातील सगळीच हॉटेल्स बऱ्यापैकी फुल्ल झाल्याने पर्यटनाचा हंगाम खऱ्या अर्थाने गती घेईल हे नक्कीच.
राज्यात सध्या राजकीय दिवाळी -
राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री, आमदार, भावी आमदार, समाजसेवक व कार्यकर्ते पोस्टरवर झळकत आहेत. त्यातच मागच्या आठवडाभर ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. काहींनी दिवाळीचे राजकीय फटाके फोडले तर काहीजण नुसता आश्वासनांचा धुरच सोडत आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय दिवाळीचे दिवे लागायला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा -देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी