पणजी- मांडवी नदीवर बांधण्यात आलेल्या अटलसेतू पुलावरील विद्युत रोषणाई खर्चात 35 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा घोटाळा करण्यासाठी पुलाच्या मुळ निविदेमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला आहे.
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे.
तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामात गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे जीएसआयडीसी व्यवस्थापकीय संचालकांनी ठेकेदाराला बिल अदा करू नये, असे सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसने म्हटले होते. या पुलावर विद्युत रोषणाईसाठी 44 कोटी 71 लाख रूपयांचा खर्च दाखविण्यात आला. मात्र, मूळ निविदेमध्ये हे विद्युत खांब आणि साहित्य जीएसआयडीसीने पुरवावे आणि ठेकेदार कंपनी एल अॅण्ड टी कंपनीने त्याची जोडणी करावी, असे आहे. परंतु, यामध्ये फेरफार करण्यात आली आहे. तर यासाठी प्रत्यक्ष 6 कोटी 39 लाख 84 हजार 750 रूपयांचे बिल सादर करण्यात आले आहे.
8 लाख रुपयांच्या खर्चासाठी निविदा काढणाऱ्या जीएसआयडीसीने सुमारे 45 कोटींचे काम निविदा काढण्यापूर्वी कसे केले, असा सवाल चोडणकर यांनी केला. त्यामुळे मूळ बिल पाहिल्याशिवाय जीएसआयडीसी अधिकाऱ्यांनी बिल अदा करू नये. तसेच आम्ही सांगत असले तर जीएसआयडीसीचे तत्कालीन उपाध्यक्ष असलेल्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी बिले सादर करावी, असे आव्हानही आम्ही त्यांना करत आहोत, असेही ते म्हणाले. यामधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहोत, अशी माहितीही चोडणकर यांनी यावेळी दिली.
निवडणूक आयोग मुक्त वातावरणात निवडणूक घेण्यात अपयशी : डिमेलो
केंद्रीय निवडणूक आयोगाला देशात मुक्त वातावरणात निवडणूक घेण्यास अपय आले आहे. त्याप्रमाणेच गोवा निवडणूक अधिकारी आणि भाजपने काँग्रेस उमेदवारासमोरही अडथळे निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी केला. गोवा भाजप विखुरली असून आता त्यांच्यामधील नाराजी उघड होऊ लागली आहे, अशा अवस्थेत मुक्त वातावरणात पणजी मतदार संघातील पोटनिवडणूक घेतली जावी. यासाठी येथे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करून नवा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी गोवा विधानसभा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर उपस्थित होते.