पणजी (गोवा) - शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशा रवी या 21 वर्षीय युवतीच्या अटक करण्यात आली. या घटनेचा गोवा महिला काँग्रेस निषेध व्यक्त केला आहे. ही अटक केवळ एका व्यक्तीची नसून जे सरकार विरोधात आवाज उठवू इच्छितात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो पत्रकार परिषदेत बोलताना. सरकारचा सूचक इशारा -
कुतिन्हो म्हणाल्या, पंतप्रधान कोणालाही लक्ष्य करत असून आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतात. सदर 21 वर्षीय युवती निरागसपणे आपण केवळ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, असे सांगत आहे. तरीही तिला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे मागील 80 दिवसांत 200 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याकडे लक्ष दिले जात नाही. दिल्लीत जे शेतकरी न्यायासाठी झगडत आहेत. त्यांना देशद्रोही घोषित करत हिणवले जात आहे. घटनेने दिलेल्या भाषणस्वातंत्र्यावर दबाव आणला जात आहे. दिशा रवी या युवतीची अटक केवळ तिचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न नव्हे तर देशातील अन्य लोक जे शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत आहेत, त्यांच्यासाठी हा सूचक इशारा, असल्याचा आरोप कुतिन्हो यांनी यावेळी केला.
हेही वाचा -निकिता जेकब यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय
त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून गोवा प्रदेश महिला काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच दिशा रवी हिला तत्काळ सोडून द्यावे आणि या प्रकरणी योग्य न्याय झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होत्या.