पणजी (गोवा) - काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच आगामी ग्रामपंचायत व लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसने गोव्यात चेतना यात्रा काढण्याचे ( Goa Congress Navchetna Yatra ) ठरविले आहे. यात्रेमध्ये काँग्रेसपासून दूर गेलेल्या नाराजांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जातील असे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित पाटकर ( Goa Congress newly elected president Amit Patkar ) यांनी सांगितले.
'नाराजांना पुन्हा पक्षात आणून पक्ष मजबूत करण्याचे ठरविले' -मरगळलेल्या काँग्रेसला नवचेतना देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी 21 एप्रिल पासून राज्यात नवचेतना अर्थात चेतना यात्रा काढण्याचे आयोजिले आहे. 21 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान काँग्रेस पक्ष व त्यांचे पदाधिकारी विविध मतदारसंघात फिरून काँग्रेसपासून दूर गेलेल्या नाराजांना पुन्हा पक्षात आणून पक्ष मजबूत करण्याचे ठरविले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला विजयी करण्यासाठी आतापासूनच पक्ष मजबूत व बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध कारणांनी पक्षापासून दूर गेलेल्या नाराजांना पुन्हा पक्षात आणून राज्यात काँग्रेसला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा प्राप्त करून देणार असल्याचेही पाटकर म्हणाले.