पणजी- गोव्याच्या समुद्रात अडकलेल्या नू शी नलीनी जहाजातील नाफ्ताचे स्थलांतरण हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे करावी. तसेच चौकशी काळात मुरगावचे आमदार तथा शहर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रीमंडळातून वगळावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी (दि. 1 जाने) केली आहे.
पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले, दोनापवाल समुद्रात भरकटून अडकलेल्या नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता रिकामा करून तो गणेश बेंजोप्लास्ट जहाजात स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतर घाईगडबडीत निविदा काढून तो मुंबईतील कंपनीला विकून संयुक्त अरब अमिरातीकडे रवाना करण्यात आला. यासाठी पूर्वी काढलेली आणि ज्यासाठी 5 कोटींची बोली लागली होती अशी निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आली. ज्याची पायभूत किंमत केवळ 36 लाख रूपये ठेवण्यात आली. आज ज्या कंपनीने हा नाफ्ता खरेदी केला. त्यांनी केवळ 36 लाखांचीच बोली लावली होती. त्यामुळे या कंपनीला पायाभूत किंमत कळाली कशी हा प्रश्न निर्माण होते. परंतु, यामागे स्थानिक आमदार तथा शहर विकास मंत्री मिलिंद नाईक यांचा हात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना मंत्रिमंडळातून वगळून याची चौकशी करावी. कारण निविदा जाहीर होण्यापूर्वी मंत्री नाईक त्या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन आले होते.