पणजी - ऐंशीच्या दशकात पर्यटकांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यातील मये तलाव परिसराला नव्याने आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या 'जम्पीन हाइटस' या साहसी खेळाचे आणि अन्य सुविधांचे मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते जम्पीन हाइटस खेळाचे उद्घाटन या उद्घाटन सोहळ्यासाठी गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे, सभापती राजेश पाटणेकर, मयेचे आमदार प्रवीण झांटये, सरपंच कुंदा मांद्रेकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता न्हावेलकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - गोवा सरकारकडून ४५० कोटींचा शिलकी अर्थसंकल्प
मये तलाव हा देशविदेशातील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध होता. येथे अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी नेहमी गजबजलेल्या या स्थळाकडे कालांतराने याच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दूर्लक्ष झाल्याने येथे येणारे पर्यटक हळूहळू कमी होत गेले. त्यामुळे यावर आधारित स्थानिकांनी सुरू केलेले छोटेमोठे व्यवसाय बंद झाले. याची दखल घेऊन गोवा सरकारने 2015 मध्ये मये तलाव आणि परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. यासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून 2018 मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र, एम्पिथिएटर, स्थानिक उत्पादन विक्री केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. सुरुवातीपासून असलेली बोटिंग सुविधा उपलब्ध आहे. नवी झळाळी देत असताना ' जम्पीइन हाइट्स' हा साहसी खेळ सुरू केला आहे. 12 ते 40 वयोगटातील व्यक्ती याचा आनंद घेऊ शकते. या तलावाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - बुधवारपासून 'सुमुल'कडून दूध स्विकारले जाईल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मये तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. येथे सुरू करण्यात आलेल्या जम्पीन हाइटसमुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. या स्थळाचा अजुनही विकास केला जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने पुन्हा मये तलावाला नवी झळाळी देत ' या या मया या आमच्या मया या' या गीतांप्रमाणे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.