पणजी - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर तेथून गोव्यात आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने तपासण्या आले आहेत. 900 पैकी 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अधिक तपासणीसाठी त्यांचे स्वॅब पुणे येथील व्हायरालॉजी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. आल्तिनो-पणजी येथील 'महालक्ष्मी' निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 हे वर्ष खुप आव्हानात्मक होते. तरीही मोठ्याप्रमाणात केंद्र सरकारच्या योजना राबविण्यात गोवा सरकार यशस्वी ठरले आहे, असे सांगत वर्षभारातील कामाचा आढावा देखील सावंत यांनी यावेळी मांडला.
43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल पुण्याला-
डॉ. सावंत म्हणाले, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येतात. त्यामुळे विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आज, उद्या आणि परवा मोठ्याप्रमाणात जाग्रुती करण्यात येत आहे. लोकांनी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, यासाठी पोलिसांमार्फत प्रयत्न केले जात आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. 9 डिसेंबर पासून आतापर्यंत गोव्यात दाखल झालेल्या 900 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 37 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर त्यांच्या संपर्कातील 23 पॉझिटिव्ह आढळले. यामधील 43 जणांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत दोन अहवाल मिळाले जे निगेटिव्ह आहेत. तरीही सरकार सर्व प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे.
औषध निर्मिती विभागाची कामगिरी-
2020 मधील सरकारी कामाचा आढावा घेताना डॉ. सावंत म्हणाले, कोविड-19 मुळे हे वर्ष खुपच आव्हानात्मक होते. महसूलावर परिणाम झाला. परंतु, त्यामुळे एकही सरकारी योजना बंद होऊ दिली नाही. तर 2019 च्या तुलनेत केंद्र सरकारच्या योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळा, रुग्णालय कमी कालावधीत उभारणी करण्यात आली. विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना मोठ्याप्रमाणात परत आणण्यात आले. औद्योगिक क्षेत्र बंद असताना येथील औषध निर्मिती विभाग सुरू होता. ज्यामुळे सॅनिटायझर, पीपीई किट आणि औषधे तयार करण्यात आली. ती देशाबरोबर विदेशातही पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. या काळात 1 लाख 20 हजार परराज्यातील कामगार आपल्या गावी परतले. त्यांना जाण्यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.