पणजी- सुमुल दूध उत्पादक कंपनीने सोमवारी गोव्यातील साळ आणि डिचोली भागातील शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले होते. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती.
बुधवारपासून 'सुमुल'कडून दूध स्विकारले जाईल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध
गोव्यातील सुमुल दूध उत्पादक कंपनीने सोमवारी शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी गोवा विधानसभा परिसरात दूध ओतून निषेध व्यक्त केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री सावंत यांनी सुमुलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध ओतण्याची ही गोव्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेतील दालनात सुमुलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना, बुधवारी सुमुलच्या प्रादेशिक व्यवस्थापकांशी बैठक होणार आहे. आज त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता दूधात अँटिबायोटिकचा अंश सापडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उद्यापासून नियमित दूध स्वीकारून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे आपण सांगितले आहे. यामुळे बुधवारपासून 'सुमुल' दूध स्वीकारण्यास तयार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.
सुमुलचे गोवा विभागाचे उपव्यवस्थापक (उत्पादन) उत्कल दवे यांच्याशी बातचीत केली असता, कालचा प्रकार शेतकरी आणि आमच्यातील संवादाच्या कमतरतेमुळे घडला आहे. ज्या दूधात अँटिबायोटिक आढळून आले होते. त्या दूधाचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासणी करिता पाठविण्यात येणार आहे. हा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे गायींना देण्यात आलेल्या अँटिबायोटिकचा अंश दूधात आढळतो. पावसाळ्यात अशा घटना आढळतात. यावर आम्ही काम करत आहोत, असे दवे यांनी सांगितले. मात्र कालच्या प्रकारात नेमकी चूक कोणाची आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.