पणजी (गोवा) - राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (बुधवारी) सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्य सरकारला खाण बंदी, महापूर यासह राज्यातील विविध प्रश्नावर पूर्णतः घेरण्याचा डाव विरोधी पक्षाने रचला आहे. तर सरकारही पूर्ण क्षमतेने या अधिवेशनाला सामोरे जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. खाण बंदी, तौक्ते चक्रीवादळ आणि आताच येऊन गेलेला महापूर अशा जनतेच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. हे भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांकडे निवेदन देऊन केली आहे.
आजपासून तीन दिवशीय पावसाळी अधिवेशन -
आजपासून पुढचे तीन दिवस म्हणजे 28 ते 30 जुलैदरम्यान हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने किमान 10 ते 15 दिवस अधिवेशनाची मागणी केली होती. मात्र, कोरोनाचे कारण देत अधिवेशन तीन दिवस घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य चालवण्यास सरकार अपयशी -
एकीकडे राज्यातील जनता पाऊस, महापूर, चक्रीवादळाने हवालदिल झाली आहे. मात्र, असे असतानाही राज्य सरकार त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.