पणजी (गोवा) -गोवा निवडणुकीच्या मतदानाचे काउंटडाऊन ( Goa Assembly Election 2022 ) सुरू झाले आहे. गोव्यात मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. १ हजार ७२२ मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान होणार आहे. ११ लाख ६५ हजार मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार ( Voting countdown begins in goa ) आहेत.
गोवा निवडणुकीत ९ प्रादेशिक पक्ष आपले नशीब आजमावत आहेत. ४० जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी ईव्हीएम मशीन वाटप पूर्ण झाले आहे. यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर संपूर्ण सतर्कता बागळली गेली आहे. ईव्हीएम मशीनची तपासणी करून ती मतदान केंद्रावर पाठवण्यात आली आहे. कोरोनाबाधितांना या मतदानात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पीईपी किट घालून कोरोना रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
गोव्यात मतदारांसाठी विशेष ग्रीन आणि पिंक पोलिंग स्टेशनची निर्मिती
गोवेकरांना गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन मतदान केंद्रावर घडविण्यासाठी निवडणूक आयोगाने चक्क ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. सोबतच खास महिलांसाठी पिंक पोलिंग स्टेशन उभारण्यात आला आहे. महिलांसाठी खास 105 पिंक पोलिंग स्टेशनची निर्मिती आयोगाने केली आहे.
असा असणार ग्रीन पोलिंग स्टेशन
गोवा म्हणजे हिरवेगार निसर्ग, निळाशार समुद्र आणि यात वसलेली लोकवस्ती आणि संस्कृती. अर्थातच गोवेकरांच्या या संस्कृतीचे दर्शन गोवेकरांना घडविण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यात 11 ठिकाणी अशा ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. यात पोलिंग स्टेशनवर मतदार आल्यानंतर खास त्यांच्यासाठी ग्रीन कार्पेट लावण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदानाच्या ठिकाणी सर्वच साधने ही पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आली आहेत. यात शाईच्या पेनापासून बसायची खुर्चीदेखील गोवन पद्धतीने सजवण्यात आली आहे. त्यातच गुप्त पद्धतीने मतदान करण्यासाठी मतदान यंत्राभोवतीचे आच्छादन देखील बांबूच्या जाळीपासून बनविण्यात आले आहे.