पणजी- गोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचा ५-० असा पराभव करणे, हेच आमचे लक्ष्य आहे. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे विधान काँग्रेसचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी केले.
काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, भाजपचा गोव्यातील जनतेशी संपर्क तुटला आहे. त्यामुळेच ते लोकशाहीला घातक निर्णय घेत आहेत. त्यामुळे भाजपने आयोजित केलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात खोटे बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असे म्हटले आहे. गोव्यातील जनतेला येथे खोटे कोण बोलतो हे माहीत आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या गोमंतकियांनी भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला अनेक भाजप कार्यकर्तेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करत आहेत.
प्रचाराच्या निमित्ताने राज्यात फिरत असताना सर्वत्र बेरोजगारीची चिंता दिसून येत आहे. त्यामुळे इथल्या युवकांनी लोकसभेत जाण्याची मला संधी दिली तर गोव्यात असणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये कोकणी भाषिकांना रोजगार कसा मिळेल, याचा पाठपुरावा करणार. यामुळे थोड्याफार प्रमाणात बेरोजगारी कमी होईल शिवाय त्याचे लाभ खऱ्या अर्थाने गोमंतकियांना मिळतील, यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.