पणजी- म्हादई अभयारण्य क्षेत्रात गोळावली गावाजवळ वाघांचा संचार असल्याची माहिती असूनही गोव्याच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे चार वाघांचा बळी गेला, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्याबरोबरच यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई म्हणाले, उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळावली गावात चार दिवसांत चार वाघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. यामधील मृत बछडे हे अजून सहा महिन्यांत पूर्ण वाढ होऊन मुक्त संचार करण्यासाठी तयार होणार होते. परंतु, या घटनेने गोव्याच्या पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. सदर कृत्य करणाऱ्यांवर कायद्याने जी कारवाई होईल ती झालीच पाहिजे. परंतु, त्यांची संपूर्ण चौकशीही व्हायला पाहिजे.
पुढे ते म्हणाले, की 22 डिसेंबरला या गोळावली गावाच्या हद्दीत वाघाने एका गायीची शिकार केली. त्यानंतर 30 डिसेंबर 2019 ला एक म्हशीला ठार केले. याचा अर्थ येथे वाघाचा संचार होता. याची माहिती स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली होती. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत वाघांच्या सुरक्षेची काळजी घेण्याऐवजी किती वाघ आहेत, हे पाहण्यासाठी कॅमेरे लावण्यास सांगितले. दरम्यान, वाघांच्या मृत्युची चौकशी वन्यजीव गुन्हा नियंत्रण संस्था आणि सीबीआय मार्फत करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.