पणजी (गोवा) - राज्यातील 11 नगरपालिकांसाठी 20 मार्चला मतदान तर 22 मार्चला मतमोजणी होणार आहे. तर याच दिवशी दोन ग्रामपंचायत, एक जिल्हा पंचायत मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येथील संस्कृती भवनात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी राज्याचे सचिव मेलवीन वाझ, डॉ. दुर्गा प्रसाद, आशुतोष आपटे, राज्य निवडणूक आयोग सहाय्यक संचालक सागर गुरव आदी उपस्थित होते.
एकमेव महापालिका पणजीसाठी ईव्हीएमचा वापर -
गोव्यात 13 नगरपालिका आहेत. उत्तर गोव्यात 6 तर दक्षिण गोव्यात 7 नगरपालिका असून ज्या नगरपालिकांच्या कार्यकाळ मार्च महिन्यात पूर्ण होत आहे. अशा नगरपालिकांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. यामध्ये मुरगांव, मडगाव, म्हापसा, डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे, केपे, काणकोण, सांगे, पेडणे आणि वाळपई यांचा समावेश आहे. यासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाईल. तर राज्यातील एकमेव महापालिका पणजीसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, नगरपालिका आणि महापालिका दोन्ही निवडणुका पक्ष चिन्हावर होणार नाहीत. या निवडणुकीत उत्तर गोव्यात 57 हजार 456 तर दक्षिण गोव्यात 1 लाख 93 हजार 14 इतके मतदार पात्र आहेत.
याच दिवशी आगशी ग्रामपंचायतच्या प्रभाग 7 (अनुसूचित जमाती) आणि मेरशी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 4 आणि 11 (दोन्ही खूला प्रवर्ग) मध्ये पोटनिवडणूक होईल. तसेच दक्षिण गोवा जिल्ह्यातील नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.