पणजी- सर्व नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गोवा सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत ज्यांचे बील थकीत आहे, अशा ग्राहकांना एकरकमी बील भरून पुढे नियमित बील भरणा करणे सोपे व्हावे, यासाठी 'वन टाईम सेटलमेंट' योजना सुरू केलेली. या योजनेची मुदत 31 जानेवारी 2021 ला संपत आहे. परंतु, लोकभावनेचा विचार करत सरकारने याला 28 फेब्रुवारी 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभूपावसकर यांनी दिली.
पावसकर म्हणाले, पाणी पुरवठा विभागाच्या वनटाईम सेटलमेंट योजनेमुळे ज्यांचे नळजोडणी बील थकीत आहे, अशा ग्राहकांना यामुळे बिलात मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी नोटिफिकेशनद्वारे याची घोषणा करण्यात आली होती. ज्यामुळे आतापर्यंत 71 प्रकरणांतून 40 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. लोकांचा विचार करता दि. 31 जानेवारी 2021 ला संपणाऱ्या या योजनेला सरकारने दि. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सरकारला 71 कोटी महसूल प्राप्त होईल
ज्यांचे तात्पुरते अथवा कायमस्वरूपी नळजोडणी तोडण्यात आली आहे. त्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारला 71 कोटी महसूल प्राप्त होईल. ज्या ग्राहकांना याचा लाभ घ्यायचा आहे, अशांनी नोंदणी केल्यानंतर सात दिवसांच्या आत पहिला हप्ता भरला तर त्याला 100 टक्के सूट मिळणार आहे. तसेच 3, 4, 5, 6 अशा हप्त्यांमध्येही रक्कम भरण्याची यामुळे संधी मिळणार आहे.