पणजी -गोव्यात दरवर्षी किमान १ हजार व्यक्तींना कर्करोगाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज विधानसभेत दिली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज सत्ताधारी भाजपचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस यांनी प्रश्न विचारले. त्यालाच जोडून काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि प्रतापसी राणे यांनी पुरवणी प्रश्न उपस्थित केले.
फर्नांडीस यांनी गोवा सरकारतर्फे कॅन्सर रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या नव्या रुग्णालयात यावरील उपचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करावे अशी मागणी केली. तर प्रतापसिंह राणे यांनी गोव्यातील कँन्सर रुग्णांची आकडेवारी आणि कारणे सरकारकडे उपलब्ध आहेत का? असा प्रश्न केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी यासाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून कारणे शोधावीत अशी मागणी केली.
यावर बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले, "गोव्यात दरवर्षी १ हजार कँन्सर रुग्ण आढळून येत आहेत. छाती, डोके, गळा आणि रक्ताच्या कँन्सर रूग्णांची संख्या अधिक आहे. यासाठी सरकार पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने कारणांचा शोध घेत आहे. अनेक कारणांपैकी बदलती जीवनशैली हेही एक कारण आहे. सरकारने अधिक क्षमतेने आरोग्य सुविधा देण्यासाठी खाजगी भागिदाराची गरज आहे."
आरोग्य खात्यातील भरती कधी?
भाजपचे शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी आरोग्य खात्यात विविध प्रकारची ७०० ते ८०० पदे रिक्त असून रिक्तपदे कधी भरली जाणार आहेत? असा प्रश्न आरोग्य मंत्र्यांना विचारला. तेव्हा मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, आरोग्य खात्यातील पदांची भरती ही जीपीएससीमार्फत (गोवा लोकसेवा आयोग) भरली जातात. परंतु, सध्या जीपीएससी अशी भरती करत नाही. अन्यथा आरोग्य खात्याकडून पदे रिक्त ठेवली जात नाहीत.
दरम्यान, भाजप आमदार क्लाफासिओ डायस यांनी रेबीज लसीच्या असलेला तुटवडा कधी दूर करणार असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, सर्व ठिकाणी यावरील लस उपलब्ध असून गोव्यात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.