पणजी : जुने गोवे येथील ऐतिहासिक अशा बासिलिका बॉम जीजस या चर्चच्या छताच्या दुरुस्ती कामाला दिरंगाई होत असल्याने इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी खंत या चर्चचे रेक्टर फादर पँट्रिशिओ यांनी प्रसारमाध्यमातून सरकारच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी नुकतीच या चर्चला भेट देत कामाची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याकडून जुन्या गोव्यातील बासिलिका बॉम जीजसची पाहणी - old church in goa
रेक्टर फादर पँट्रिशिओ यांनी जुन्या गोव्यातील बासिलिका बॉम जीजस या चर्चच्या डागडुजीबद्दल दिरंगाई होत असल्याचे सांगितले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी चर्चला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे अधीक्षक के. अमरनाथ रामकृष्ण, गोव्याचे पुरातत्व खात्याचे सहाय्यक पुरातत्व अधीक्षक डॉ. वरद सबनीस आणि चर्चचे रेक्टर फादर पँट्रिशिओ आदी उपस्थित होते. कामाची पाहणी केल्यानंतर कवळेकर म्हणाले, या चर्चेला ऐतिहासिक महत्त्व आणि जागतिक वारसा आहे. त्यामुळे या ठिकाणाची निगा राखणे, वास्तूला हानी पोहचवू न देणे प्रत्येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे. याच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे काम पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाकडे आहे. परंतु, याचे काम सुरळीत आहे की नाही, याकडे नैतीक जबाबदारी म्हणून स्थानिक सरकार पाहत आहे.
खात्याने नियुक्त केलेला कंत्राटदार लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे कामाला दिरंगाई होत होती. परंतु, आता स्थानिक कंत्राटदार नियुक्त करून त्याच्याकडे दुरुस्ती काम सोपविण्यात आले आहे. पावसापूर्वी हे काम आटोपले पाहिजे. याठिकाणी काम खूप आहे. परंतु, गोवा पुरातत्व खात्याकडे मुबलक निधी नाही. ही बाब केंद्रीय पुरातत्व खात्याचे मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या कानावर घालणार आहेत. यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.