पणजी (गोवा) -सत्तरी तालुक्यातील करंजाळे याठिकाणी म्हादई अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांच्यात व स्थानिकांमध्ये झालेल्या झटापट झाली. यावेळी नारायण देसाई यांना मारहाण झाल्याच्या कारणाखाली करंझोळ, कुमठोळ व बंदीरवाडा भागातील एकूण 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळपईच्या पोलीस ठाण्यात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. सरकारच्या या कृतीबद्दल या तिन्ही गावातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे.
वन अधिकारी व स्थानिकांमध्ये झटापट झाल्याची दृश्ये बुधवारी 12 मेला घडली घटना -
म्हादई अभयारण्य परिक्षेत्र अधिकारी नारायण प्रभुदेसाई व त्यांच्या वरिष्ठ अधिकारी तेजस्विता व इतर कर्मचाऱ्यांसोबत एक पथक कृष्णापुरच्या दिशेने 12 मेला जात होते. यावेळी बंदीरवाडा याठिकाणी एक महिला आपल्या घराची शाकारणी करीत होती. यावेळी वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई व सबंधित महिलेमध्ये बाचाबाची झाली. यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी बंदिरवाडा याठिकाणी नारायण प्रभुदेसाई व इतरांची वाहने रोखून धरून यासंदर्भात जाब विचारला होता. याप्रसंगी प्रभुदेसाई यांनी हवेत तीन वेळा गोळीबारही केला होता. तर याचवेळी नारायण प्रभुदेसाई यांनी आपणांस मारहाण झाल्याची तक्रार स्वतः पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
हेही वाचा -गोवा घटकराज्य दिनी व्हर्च्युअल पद्धतीने होणार कार्यक्रम; 12 वीच्या परीक्षेबाबत अद्यापही निर्णय नाही
गोळीबार करणाऱ्या वन अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल नाही -
नारायण प्रभुदेसाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर वाळपई पोलिसांनी तीनही गावातील एकूण 54 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सरकारी अधिकाऱ्याला त्यांच्या कर्तव्यापासून रोखून धरणे व त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे, अशाप्रकारचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. मात्र, महिलेने दाखल केलेली तक्रार यासंदर्भात वन अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यामुळे सध्यातरी सदर भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार अधिकारीवर्गाच्या संरक्षणासाठी की सर्व सामान्य जनतेच्या सहकार्यासाठी? अशाप्रकारचा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता -
नारायण प्रभुदेसाई यांच्यावर कारवाई करावी अन्यथा वाळपई पोलीस ठाण्यात मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरिकांनी सरकारला दिला होता. मात्र, ऐनवेळी हा मोर्चा का रद्द करण्यात आला या संदर्भाची वाच्यता अजूनपर्यंत झालेली नाही. वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी हवेत गोळीबार करून जमावाला चिथावण्याचा प्रयत्न करणे, अशा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र, असे असतानाही यासंदर्भातील नोंद पोलिसांनी न करणे यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष दिसत आहे. एकूण दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात स्थानिक आता कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. स्थानिक व अभयारण्याचे व्यवस्थापन यांच्यामधील निर्माण झालेला संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -कोर्टानं फटकारल्यामुळे मुख्यमंत्री निराश - आमदार विजय सरदेसाई