पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी राष्ट्रीय व राज्य पातळीवर वैद्यकिय सेवा व नागरी पुरवठा सेवा हाताळण्यासाठी सदर क्षेत्रांतील तज्ञ तसेच लष्कराचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या दोन कृती दलांची स्थापन करावी. त्यांच्याकडून कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी उपाय योजना राबवावी, अशी मागणी गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांना तसे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
काॅंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे ज्या लोकांना आर्थिक झळ बसेल, त्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच वैद्यकिय सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली होती. त्याला पाठिंबा देताना कामत यांनी पंतप्रधान यांच्याकडे कृतीदलाची मागणी केली आहे. लष्कराचा कृतीदलात समावेश केल्याने शिस्त आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला मदत होईल. हे संकट अधिक उग्र होऊ शकते, हे विचारात घेत आताच योग्य व कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.
हेही वाचा...#CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा
'जीवनावश्यक वस्तुंचा अखंडीतपणे पुरवठा करावा. गरीब व गरजवंताना मोफत वा सवलतीच्या दरात वस्तु मिळवुन देणे, यासाठी वेगळ्या कृतीदलाची गरज आहे. सरकारने या सुविधा आताच सुरू केल्यास नागरिक जास्त काळ बंद लागु केल्यास त्यास पाठिंबा व सहकार्य देतील. गोवा सरकारने जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सकाळी दुकाने उघडी ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु, लोकांनी अकारण गर्दी न करता, आपणास आवश्यक तेवढ्याच वस्तु खरेदी कराव्यात व कारण नसताना घरात साठवणूक करू नये. लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान राखावे व पोलीस व सरकारी कर्मचारी व इतरांना सहकार्य करावे' असेही कामत म्हणाले.