पणजी- खाण व्यवसाय बंद झाल्याने 40 हजारांहून अधिक कुटुंबातील कर्ते बेरोजगार झाले. यंत्रे गंजत पडली आहेत. सरकारच्या महसुलाचे मुख्य साधन बंद झाले. अशावेळी वारंवार न्यायालयात जाऊन हा उद्योग बंद पाडणाऱ्यांना सरकारने राज्यातून तडीपार करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी आज विधानसभेत केली.
बंद झालेला खाण व्यवसाय का सुरू होत नाही आणि यासाठी सरकारने केंद्र सरकारची किती वेळा भेट घेतली हे स्पष्ट करावे, अशी मागणी करत राणे म्हणाले, हा व्यवसाय का सुरू होत नाही? राज्यात काही बेरोजगार मंडळी अशी आहेत की, वारंवार न्यायालयात जाऊन स्थगिती आणत असतात. अशांना तडीपार केले पाहिजे, ज्यांना अनेकांचे संसार रस्त्यावर आणले आहेत. सरकारला महसूल मिळत नाही , बेरोजगारी वाढत आहे यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी राणे यांनी केली.
प्रसंगी भटक्या गुरांचा लिलाव करावा -
राज्यात अनेक रस्त्यावर मोकाट गुरांचे प्रमाण वाढले आहे. जे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढवत आहेत. याला आळा घालण्यासाठी पशू वैद्यकीय खात्याने या भटक्या गुरांना एकत्रित करावे. गोव्यातील रस्त्यावर मोकाटपणे जनावरांना सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करावा. तसेच ज्यांना मालक नसेल आणि पशूवैद्यकीय खात्याला सांभाळणे कठीण असेल, अशा दूधाळ जनावरांचा लिलाव करावा. ज्यामुळे दूध उत्पादन वाढेल. मात्र, अशी गुरे पंचायतीला देऊ नयेत, अशी मागणीही प्रतापसिंह राणे यांनी केली.
दरम्यान, यावर्षी वनमहोत्सवात साजरे होताना न दिसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत राणे म्हणाले, वनाचे प्रमाण घटत आहे. यासाठी मंत्री-आमदार यांनी पुढाकार घेत फळ झाडांची लागवड केली पाहिजे. त्याबरोबर विद्यार्थ्यांना सोबत घेत गोव्यातील अभयारण्यातही वृक्ष लागवड केली पाहिजे.