पणजी - अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी पक्षाकडून होणाऱ्या कोणत्याही टीकेचे दडपण मी घेत नाही. विरोधी पक्षाचा घटक म्हणून निवडून दिलेल्या लोकांचा आवाज सभागृहात उठवत राहताना या भ्रष्टाचारी सरकारसोबत संघर्ष सुरूच राहील, असे गोवा फॉरवर्डचे पक्षाध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
दडणाशिवाय सभागृहात बोलत राहणार -
गोवा सरकार विधानसभेचा फार्स बनवला आहे. अशावेळी विरोधी पक्षाचे काम आहे की, लोकांचा आवाज सभागृहात उठवत राहणे. कोणत्याही दडणाशिवाय आम्ही तो सभागृहात उठवत राहणार. काल(मंगळवारी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते की, काही समाजविघातक तत्वे युवकांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत. त्यांच्या या विधानाचे आश्चर्य वाटले. कारण एकाबाजूने गांजा लागवड करण्याची भाषाही तेच करत आहेत. 2035चे हे व्हिजन आहे काय? डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा अहवाल, राज्यात हेरिटेज कल्चर, टुरिझम, नॉलेज सेंटर आवश्यक असल्याचे सांगतो. याकडे सरकार लक्ष देत नाही. कोणत्याही नियंत्रणाशिवाय कॅसिनो सुरू आहेत. मी कॅसिनो विरोधात नाही. कारण आता ते गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनले आहेत. पण, त्यांच्या नियंत्रणासाठी गेमिंग कमिशन आवश्यक आहे, असे आमदार सरदेसाई म्हणाले.