पणजी - राजधानीत दर्यासंगमावर थाटात उभी असलेली कला अकादमीची वास्तू कलाकरांबरोबरच पर्यटकांना आकर्षित करत असते. पावसाळा संपता संपता दरवर्षी नवा साज घेत असते. यासाठी कलाकार राबत असतात. परंतु, मूळ रंगसंगतीला कुठेही तडा दिला जात नाही. त्यामुळे अनेक वर्षे होऊनही सदर कलाकृती आहे तशी आहे, असा भास होत असतो.
पणजीतील इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) करिता कला अकादमीचे नाट्यगृह आणि परिसर वापरला जातो. याची प्रेक्षक क्षमता ९०० पेक्षा अधिक असल्याने चित्रपट रसिकांना तिकीट उपलब्ध होण्यास मदत होते. त्याशिवाय येथील 'ब्लँकबॉक्स' मध्ये या काळात विविध मान्यवरांच्या मुलाखती, कार्यशाळा दिवसभर होत असतात. त्यामुळे इफ्फीमध्ये कला अकादमीला महत्त्वाचे स्थान आहे.
या पार्श्वभूमीवर कला अकादमीची दरवर्षी रंगरंगोटी केली जाते. पण यासाठी कलाकारांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. कारण या इमारतीची रंगसंगती आणि त्यावरील कलाकृती मागील अनेक वर्षे आहे तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कला अकादमीला भेट देणाऱ्याला मोकळ्या जागेतील सार्वजनिक ठिकाणी असलेली ही कलाकृती दरवर्षी नवी भासते.