पणजी -कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लोकांनी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. दुसरी लाट रोखणे लोकांच्या हाती आहे. परंतु, आलीच तर त्याला आळा घालण्यासाठी आमची पूर्वीपेक्षा चांगली तयारी आहे. आमच्याकडे पुरेशा खाटा आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहे, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आज सांगितले.
गोव्याची आरोग्य यंत्रणा सक्षम-
गोमेकॉ येथे माध्यमांशी बोलताना डॉ. बांदेकर म्हणाले, गोव्याच्या शेजारील राज्यांमध्ये काही ठिकाणी कोरोना प्रादूर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याची शक्यता असल्याचे ऐकण्यात आले आहे. परंतु, गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने आम्ही कोणाला रोखू शकत नाही. मात्र, महाराष्ट्र अथवा कर्नाटकात गेल्यावर आमच्याकडे जशाप्रकारे 48 तासांतील आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र मागतात त्याप्रमाणे जर सरकारने मागितले तर पॉझिटीव्ह रुग्ण येण्याचे थांबेल. कदाचित दुसरी लाट आली तर ती रोखण्यासाठी गोव्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. सध्या आमच्याकडे उपलब्ध खाटांपैकी केवळ एकदशांश उपयोगात आणल्या गेल्या आहेत. तसेच व्हेंटिलेटरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.