पणजी - अलिकडील काळात देशात नव्याने स्थापन झालेल्या प्रौद्योगिकी संस्थामध्ये सर्वोत्तम ठरलेल्या गोवा प्रौद्योगिकी संस्थेचा पाचवा दीक्षांत सोहळा शनिवारी 28 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. मडगावातील रवींद्र भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था दोनापावलचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना संचालक डॉ. गोपाळ मुगेराय या सोहळ्या विषयी माहिती देण्यासाठी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत संचालक डॉ. गोपाळ मुगेराय म्हणाले, या सोहळ्यात 111 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 69 बी.टेक, 39 एम. टेक आणि 3 पी.एचडी. धारकांचा समावेश आहे. संस्थेने एनआयआयएफ मानांकनात 87 वे स्थान प्राप्त केले आहे. या संस्थेचा प्रगती आलेख स्थापनेपासून वाढत आहे. तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई करत आहेत.
हेही वाचा -राजकारण, ड्रामा आणि रोमान्सने भरलेला आहे 'प्रस्थानम' - अमायरा दस्तुर
संस्था कुंकळ्ळी येथील स्वतःच्या इमारतीमध्ये 20 एप्रिल 2021 मध्ये प्रवेश करणार आहे, असे सांगत मुगेराय म्हणाले, हा परिसर 124 एकर जागेवर आहे. ज्यासाठी पहिल्या टप्प्यात 390 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, कचरामुक्त गोवा हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी 50 प्राचार्य आणि 50 माध्यमिक शिक्षकांना एकत्रित प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये संदेश पाठविला जाणार आहे. तसेच गोव्याबाहेरील विद्यार्थ्यांना येथील संस्कृतीचा परिचय करून देत चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न आहे. संस्थेने आतापर्यंत देशविदेशातील प्रसिद्ध सात कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. तसेच 14 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोव्यातील डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेजशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ज्यामुळे येथील विद्यार्थ्यांना विशेषतः महिलांना पीएचडीचे शिक्षण घेता येणार आहे. संस्थेने सातवर्षे पूर्ण केली असून स्वतःची जागा नसतानाही गुणवत्तेच्या आधारावर विदेशात नाव प्राप्त केले आहे. तसेच अनेक विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत. काही देशांशी बोलणं झालं आहे, असेही डॉ. मुगेराय यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..