पणजी- गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींचा वेग वाढला आहे. राज्यात गणेश विसर्जनानंतर भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते पी. चिदंम्बरम आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राज्याचा दौरा करून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक पक्षात नारांजांची समजूत काढणारे नेते आणि तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी बड्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसून येत आहे. भाजप काँग्रेस नेत्यांकडूनही परस्परविरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन राजकारण अधिक तापवल्याचे चित्र सध्या पणजीमध्ये दिसून येत आहे.
भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांची भेट घेतली, त्यातच गुरुवारी दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सर्दीन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याच पक्षातील काही नेत्यांवर निवडणूक व्यवस्थेवरून टीका केली. त्यामुळेच दक्षिण गोव्यातील काही आमदार नाराज असल्याचे दिसून आले. यापैकी आमदार अॅलेक्स रेजिनाल्ड यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. याविषयी त्यांना विचारणा केली असता, माझ्या मतदारसंघातील विकास कामाच्या चर्चेविषयी भेट घेतली असल्याचे सांगितले, आणि बाकीच्या विषयावर नो कॉमेंटस असे उत्तर देत तेथून काढता पाय घेतला.
बाकीच्या आमदारांची इतरही कामे- मुख्यमंत्री
आमदार अॅलेक्स रेजिनाल्ड यांच्या भेटीच्या कारणाविषयी मुख्यमंत्री सावंत यांना विचारणा केली असता, निवडणुकीच्या पूर्वी आपल्या मतदारसंघतील कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक आमदार भेट घेतात, मात्र त्यांची इतरही कामे असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी एक मिश्किल हास्य करत विरोधकांना टोला लगावला.