पणजी- पणजीतील कँसिनो हटविण्याची मागणी आणि आमदारांसह महापौर, माजी महापौर यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसने शनिवारी आंदोलन केले. मांडवीतील एका कँसिनो आस्थापनाने पदपथावर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी पणजीचे आमदार, महापौर आणि माजी महापौर गेले होते. यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाईचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, आमदार टोनी फर्नांडिस, पणजीच्या उपमहापौर, महिला काँग्रेस पदाधिकारी आणि पणजीतील शेकडो नागरिकांनी संध्याकाळी आझाद मैदान ते जेटी, असा निषेध मोर्चा काढत बिग डॅडी या कॅसिनो आस्थापनेसमोर निदर्शने केली. परंतु, तेथे संध्याकाळ पासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला पोलीस मोठ्यासंख्येने तैनात होत्या.
प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा कँसिनोच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये हमरीतूमरी झाली. पोलीस आंदोलकांना रोखून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर आझाद मैदानावर मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी कुतिन्हो म्हणाल्या, २५ वर्षांत जे पणजीच्या आमदाराला जमले नाही. ते करण्याचा प्रयत्न बाबूश मोन्सेरात यांनी निवडून येताच सुरु केला. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कृती करत पणजी स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. तशी संधी त्यांना मिळू नये याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय बाबूश यांनी कँसिनो बंद नव्हे तर स्थलांतरित करणार असे म्हटले होते. त्यामुळे कँसिनोच्या वतीने बाजू मांडणाऱ्या महिलांनी येत्या ४८ तासांत कँसिनोमध्ये किती पणजीवासीयांना रोजगार मिळाला ते जाहीर करावे. तसेच महिला कँसिनोमध्ये काय करत होत्या हेही त्यांनी सांगावे, असे आवाहन कुतिन्हा यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारच्या घटनेची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर यतीन पारेख यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पणजी पोलिस स्थानकांत शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.