पणजी - नव्या वर्षात पुन्हा गोवा माईल्सवरुन खाजगी टॅक्सीमालक तसेच बसमालक यांचा गोवा सरकारशी पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खासगी टॅक्सीधारक ही सेवा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तर, राज्य सरकार ही सेवा पारदर्शी असल्याने त्यांच्या पाठीशी आहे.
सुदीप ताम्हणकर यांची प्रतिक्रिया खाजगी टॅक्सीधारकांचा जीवनमरणाचा प्रश्न -
गोवा माईल्स ही अॅपवरील टॅक्सीसेवा सुरू झाल्यापासून खासगी टॅक्सीधारक आणि राज्य सरकार यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. ही सेवा रद्द करावी अशी मागणी मागणी सातत्याने होत आहेत. तर, राज्य सरकार त्यांच्या सेवेवर ठाम आहे. यापूर्वी विधानसभेतही यावरून जोरदार चर्चा झाली होती. तेव्हा पारंपरिक टॅक्सीधारकांनी या सेवेत सहभागी व्हावे, अथवा आपल्या टॅक्सीला मीटर बसवावे, असे सुचवले होते. दरम्यान, सरकारने हे अॅप आणून गोव्यातील 20 ते 30 हजार खाजगी टॅक्सीधारकांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला जर लोकांचे हीत अपेक्षित असेल, तर हे अॅप रद्द करावे. तसेच निवृत्त न्यायाधीश अथवा समपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी करावी, अशी मागणी गोवा खासगी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे.
दिव्यांगांसाठी रँम्प तयार करणे त्रासदायक -
लोक अॅपवरील टॅक्सी सेवेवर खूश आहेत. त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असे विचारले असता ताम्हणकर म्हणाले, लोकांना नेहमीच नव्या गोष्टींबद्दल आकर्षक असते. त्यातून त्यामध्ये गुंतून जातात आणि अडचण निर्माण होताच दूर जातात. तोपर्यंत पारंपरिक व्यावसायिक दूर जाऊन त्यांची जागा नवा कोणीतरी घेत असतो. तसेच त्याबरोबरच राज्य परिवहन खात्याने नव्या आदेशाद्वारे खासगी बसमध्ये दिव्यांगांसाठी रँम्प तयार करावा, अशी केलेली सूचना त्रासदायक आहे. ती मागे घ्यावी. सध्या कार्यरत असलेल्या गाड्यांमध्ये अशी दूरुस्ती शक्य नाही. ती नव्याने बांधल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये शक्य आहे. त्याबरोबरच संपूर्ण गोव्यात 30 हजार दिव्यांग आहेत. त्यामधील 20 हजारांना गाड्या दिल्या आहेत. उर्वरित 10 हजार जणांसाठी अशाप्रकारची बांधणी करून वाहतूक सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
'गोवा माईल्स' हवेच -
गोवा माईल्स ही अॅपवरील टॅक्सीसेवा हवी आहे. परंतु, सरकार पारंपरिक टॅक्सीधारकांच्या विरोधात नाही. काही लोकांमुळे गोव्याबाहेर या व्यावसायाचे नाव खराब झाले आहे. शिवाय टॅक्सीमालकांनी जर मीटर बसवले असते, तर हा प्रश्न निर्माण झालाच नसता. सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे हा व्यवसाय चालवावा, अशी प्रतिक्रिया गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'पोलीस महासंचालकांनी कंटाळून प्रतिनियुक्ती मागण्याची इतिहासातील पहिलीच वेळ'