पणजी - आतापर्यंत गोव्याच्या किनारी भागात अमलीपदार्थ मिळतात, असा समज होता. मात्र, ते आता अंतर्गत भागात खेडोपाडी पोहचले आहेत. म्हणून अन्य क्षेत्रातील भ्रष्टाचार परवडेल. मात्र, हे परवडणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी गोवा काँग्रेसने केली आहे. येथील काँग्रेस भवनात गोवा काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर हे बोलत होते.
पणजी येथील काँग्रेस भवनात गोवा काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. चोडणकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री विधानसभेत आणि सभागृहाबाहेर राज्यात कोठेही अमलीपदार्थ नाहीत, असे म्हणतात. मग डिचोलीसारख्या ग्रामीण भागात अमलीपदार्थ सेवन केलेला बालक रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला. हे कशाचे लक्षण आहे? यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांच्या कारखान्यात अमलीपदार्थ सापडून त्याची चौकशी न करता सोडून दिले गेल आहे. यामधून मुख्यमंत्री कोणता संदेश देत आहेत? अशा स्थितीत आईवडिलांनी आपल्या मुलांना कोणाच्या विश्वासावर शाळेत पाठवायचे, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. यावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निष्पक्ष चौकशी करू द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने यावर कारवाई केली नाही तर काँग्रेस त्यांच्या खासगी अथवा सरकारी निवासस्थानी निश्चितच मोर्चा काढेल.
हेही वाचा -नवी दिल्लीत पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये दोन गुन्हेगारांचा खात्मा
31 डिसेंबर 2019ला काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये 14 जानेवारी रोजी सरकार पुन्हा 100 कोटींचे कर्ज काढणार आहे आणि सरकार राज्याला दिवाळखोरीकडे ढकलत आहे, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने मला खोटे ठरवण्यासाठी राज्य सरकारने 14 जानेवारीचा निर्णय रद्द केला, असेही चोडणकर म्हणाले. मात्र, आज पुन्हा गोव्याचे कर्जरोखे विक्रीस काढले जात आहेत आणि राज्य सरकार आणखी 300 कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
म्हादई प्रश्नांवरून महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचाही चोडणकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील विद्यमान सरकारमध्ये ढवळीकर द्वितीय क्रमांकाचे मंत्री होते. तेव्हा कधीच 'म्हादई'बाबत आवाज उठविला नाही. सरकारमध्ये परतण्यासाठीच ते आता यावर बोलून काँग्रेसवर आरोप करत आहेत. मात्र, आमचा लढा पूर्वीही सुरू होता, तसा आजही आहे, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक भाजपचे एक मंत्री म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सर्वमान्य तोडग्याला तयार आहेत. मात्र, काँग्रेस वगळता अन्य कोणीच म्हादईबाबत बोलत नाही. याचा अर्थ काय होतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.