पणजी -गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू केली असताना आता गोव्याची निवडणूक जातीय गणितांवर होणार का? याची चर्चा रंगू लागली आहे. भारतातल्या निवडणुका या जातीय समीकरणाच्या आधारावर लढल्या जातात, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते. मात्र गोव्यासारख्या छोट्या राज्यात जातीय समीकरण यांवर निवडणुका लढवल्या गेल्याचं फारसं बोललं जात नाही. मात्र यंदा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर या भंडारी समाजाच्या उमेदवाराला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून जातीय समीकरण जुळवायला सुरुवात केली आहे. या निमित्तानं नेमकी गोव्यातील जातीय समीकरण काय आहेत आणि ती खरंच जुळवली जाणार का हे जाणून घेऊया...
गोव्यातील जातनिहाय मतदारांची संख्या
गोव्यामध्ये हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ६५ टक्के हिंदू मतदार आहेत. त्यापाठोपाठ ख्रिश्चन मतदारांची संख्या ३० टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या अत्यंत कमी म्हणजे २.८१ टक्के इतकी आहे. तर अन्य जातीतील लोकांची संख्या २.१९ टक्के इतकी आहे. मात्र हिंदू मतदारांमध्ये विविध १९ उपजातीचा समावेश आहे. ज्यामध्ये ओबीसी समाजाचा वाटा ३० ते ४० टक्के इतका आहे. गोव्यातील मतदारांची एकूण संख्या साडेअकरा लाख आहे. यापैकी ओबीसी समाजाची लक्षणीय मतदार आहेत. हिंदू समाजातील भंडारी हा सर्वात मोठा घटक गोव्यात मानला जातो. ओबीसी समाजाचे असलेले प्राबल्य पाहून आता राजकीय पक्षांनी आपली गणित मांडायला सुरुवात केली. ज्यामध्ये आपने सर्वात आधी उडी घेत भंडारी समाजाच्या अमित पालेकर या उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.
भंडारी समाजाला मुख्यमंत्रीपदाची अत्यल्प संधी -
मतदारांच्या एकूण संख्येमध्ये भंडारी समाजाची मतदार संख्या सर्वाधिक असली तरी या समाजातील आमदाराला मुख्यमंत्रीपदी फार कमी संधी मिळाल्याचं बोललं जातं. रवी नाईक हे एकमेव भंडारी समाजाचे उमेदवार मुख्यमंत्री झाले होते. त्यालाही आता २८ वर्ष लोटल्याचे वरिष्ठ पत्रकार किशोर नाईक गावकर सांगतात. ओबीसी मध्ये जवळ-जवळ १९ घटक आहेत त्यापैकी भंडारी समाज हा सर्वात मोठा घटक आहे. मात्र, तरीही या समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही, असे किशोर नाईक गावकर सांगतात. गोव्यामध्ये जातीचे राजकारण फारसे केले गेले नाही. यामुळेच या मुद्द्यांकडे कुणी फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही असही नाईक सांगतात.