पणजी -गोव्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारे कॅसिनो आणि जलपर्यटन मागच्या पाच महिन्यांपासून कोविडमुळे बंद होते. अखेर सोमवारी सरकारने 50 टक्के क्षमतेने जलपर्यटन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मागच्या दोन दिवसांपासून अनेक पर्यटकांची पावले कॅसिनोच्या दिशेने वळण्यास सुरुवात झाली आहे.
पर्यटक आणि कॅसिनो चालकांची प्रतीक्षा संपली -
गोव्याची राजधानी पणजी शहर मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. मांडवी नदीत असणारे कॅसिनो, समुद्राची सफर घडविणाऱ्या बोटी, तसेच बोटीवरील तरंगती हॉटेल ही अनेक पर्यटकांची पसंती असते. त्यातच पणजी हे राजधानीचे व प्रशासकीय शहर असल्याने अनेक पर्यटक रात्रभर कॅसिनोत जात असतात. मात्र, कोविडच्या पहिल्या लाटेत मार्च २०२० मध्ये गोव्यातील पर्यटन ठप्प झाले होते. त्यातच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे पर्यटनासाठी दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली होती. सप्टेंबर २०२० ला सरकारने हळूहळू पुन्हा एकदा पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, एप्रिल २०२१ नंतर आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा पर्यटनाला खीळ बसली होती. तेव्हापासून राज्यातील पर्यटन बंद होते. कोविडचे लसीकरण सुरू झाल्यानंतर सरकारने हळूहळू राज्यातील पर्यटन पुन्हा एकदा सुरू करण्यास परवानगी दिली होती. पर्यटन सुरू झाल्यावर अनेक पर्यटक गोव्यात दाखल होत होते. पण कॅसिनो आणि जलपर्यटन बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होत होता. अखेर सोमवारी सरकारने परवानगी देताच कॅसिनो आणि जलपर्यटन सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या पर्यटक आणि कॅसिनो चालकांची प्रतीक्षा संपली आहे.