पणजी - ईश्वराची कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध होत नाही, याचा संदेश आपला चित्रपट आपल्याला देतो, असे मत ‘ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी’ या बंगाली चित्रपटातील मुख्य कलाकार ऋतांभरी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.
गोव्याची राजधानी पणजीमध्ये सध्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. यामध्ये इंडियन पॅनोरमा मधल्या फिचर फिल्म वर्गामध्ये 'ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी' चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर कथालेखिका झिनिया सेन, चक्रवर्ती आणि अभिनेता सोहम मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटाविषयी माहिती दिली. यावेळी दिग्दर्शक अरित्रा मुखर्जी, निर्माता शिबोप्रसाद मुखर्जी, पटकथाकार सम्राज्ञी बंडोपाध्याय हेही उपस्थित होते.
हेही वाचा -सरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर केली निर्मिती : जॉन मॅथ्यू मथान
इफ्फीसाठी आपल्या चित्रपटाची झालेली निवड हा चित्रपटाचा सन्मान आहे, असे सांगून चक्रवर्ती म्हणाल्या चित्रपटाचा विषय प्रत्येकाला आपलासा वाटणारा आणि मनोरंजक आहे. यामध्ये गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले असले तरी तो आनंददायी आहे. महिलांना सर्वत्र भेदभावाला सामोरे जावे लागते. पुजारी असलेल्या महिलेची ही कथा आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीला निषिद्ध मानण्याबाबतची समजूत नष्ट करण्याचा लेखिकेचा उद्देश असून या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायला मिळाली, हा आपला सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.