पणजी : दक्षिण गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात बुधवारी ब्लॅक पॅन्थर दिसून आला आहे. या संदर्भातील माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटरद्वारे जनतेला दिली आहे. सोबत त्याचे छायाचित्रही पोस्ट केले आहे.
गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात आढळला ब्लॅक पॅन्थर, मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली माहिती
नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील कॅमेऱ्यामध्ये ब्लॅक पॅन्थर टिपण्यात आलाय. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे.
नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील कॅमेऱ्यामध्ये ब्लॅक पॅन्थर टिपण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. गोव्याच्या सम्रुद्ध वनसंपदेची ही एक झलक आहे, असे ते म्हणाले. ब्लॅक पॅन्थरच्या या दर्शनाविषयी गोव्यातील पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गोव्यात काळा वाघ सापडणे ही नवीन बाब नाही. तो बिबटाच असतो, या काळात तो काळा दिसतो. अशा प्रकारच्या वाघांचे दर्शन म्हादई अभयारण्यातही आढळतात. कधीकधी पाण्याच्या शोधात ते दुसऱ्या राज्यातून येत असतात.
नेत्रावळी अभयारण्याजवळच कर्नाटक राज्यातील काळी नदी क्षेत्रात व्याघ्रप्रकल्प आहेत, तेथून हे येत असतात. त्यांचा येथील संचारही गोव्याची समृद्ध जैविक संपन्नतेत भर घालणारा आहे. दरम्यान, गोव्यातील अभयारण्ये ही पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे येथील जंगलात विविध पशूपक्षी दिसून येत असतात. सन 2019 च्या अखेरीस म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांच्या झालेल्या हत्येमुळे गोवा प्रकाशझोतात आले होते. गोव्यात नेमके किती आणि कोणत्या ठिकाणी वाघांचे वास्तव्य आहे, याविषयी जोरदार चर्चा झाली होती. तर, गवे आणि अन्य उपद्रवी प्राण्यांचे दर्शन अनेकदा वस्तीलगत होत असते. ज्यामुळे शेतकरी, बागायतदार यांना प्रसंगी नुकसान सोसावे लागते.