महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू, आयारामांना 'नो एन्ट्री' - भाजप गोवा

गोव्यात भाजपमधील नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक इतर पक्षातील नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आयारामांना पक्षात कोणतीही संधी नसल्याचे बोलले जात आहे.

गोवा
गोवा

By

Published : Aug 21, 2021, 2:21 AM IST

पणजी (गोवा) - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात राज्यातील अनेक मोठे नेते पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र सध्या पक्षात सगळ्याच जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे आयारामांना कोणतीही संधी नसल्याचे भाजपाचे नेते तथा कोअर कमिटी सदस्य म्हाव्हीन गुडीन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

म्हाव्हीन गुडीन्हो

निवडणुकीची तयारी सुरू

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 6 ते 8 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यात राज्यात प्रत्येक उमेदवार आपला मतदारसंघ भक्कम करण्यासाठी तयारीला लागला. भारतीय जनता पक्षाने व मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी राज्यात मतदारसंघनिहाय उद्घाटन सोहळ्याच्या कामाचा धडाका लावला आहे.

भाजप मंत्री-आमदारांचा अंतर्गत वाद?

राज्यात डिजिटल मीटरवरून मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो आणि मायकल लोबो यांच्यातली अंतर्गत धुसफूस कमी झाली. त्यातच आता गुडीन्हो यांनी आपल्या शेजारील कुठ्ठाळी मतदारसंघात धुडगूस घालायला सुरुवात केली. कुठ्ठाळी मतदारसंघात विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याला तेथील स्थानिक आमदार अलींना सलढाना यांना आमंत्रण न देता मुद्दामहून डावलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार सलढाना यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गुडीन्हो यांचा चांगलाच समाचार घेतला.

काँग्रेसचा 'हा' नेता भाजपच्या वाटेवर?

माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनी मागच्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाय, ते पक्षाच्या तिकिटावर जिल्हा परिषदेत निवडूनही आले आहेत. त्याच धर्तीवर रवी नाईक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आमदार सलढाणा यांच्या विषयावर आपण कोणतेही भाष्य करणार नाही. राज्यात आधीच अनेक उमेदवार पक्षातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आणखी कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे म्हाव्हीन गुडीन्हो यांनी सांगितले.

काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर?

या आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे सर्वात जुने नेते व विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी मागील विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते सध्या प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा -सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details