पणजी- आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. युवकांनी जंक फूड टाळून आयुर्वेदिक आणि योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद या संस्थेने दोनापावल येथे २ दिवसीय आयुर्वेद युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नाईक बोलत होते.
अलिकडच्या काळात आपला देश मधूमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. यावर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व संस्था आणि सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आपली परंपरागत कुटुंब पद्धती सांभाळून युवकांना योग्य दिशा दिली जाऊ शकते. समाजातील नैराश्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब पध्दती अतिशय महत्त्वाचा घटक आहे, असे नाईक म्हणाले.